सोनिया गांधींनी अशोक चव्हाणांवर पुन्हा एकदा दाखवला विश्वास, सोपवली महत्त्वाची जबाबदारी

नवी दिल्ली, 12 मे: देशातील पाच राज्यांमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जोरदार पराभवाचा सामना करावा लागला आहे. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ, तमिळनाडू, पुदुच्चेरी (West Bengal, Pondicherry, Assam, Tamil Nadu, Kerala) या राज्यांत काँग्रेस फारशी चांगली कामगिरी करू शकला नाही. या पराभवानंतर काँग्रेस वर्किंग कमिटीची नुकतीच बैठक झाली. त्याच्या दुसऱ्या दिवशी पाच राज्यांतील पराभवाचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यीय समिती तयार करण्यात आली आहे. ज्येष्ठ नेते सलमान खुर्शिद, मनीष तिवारी, व्हिन्सेंट एच. पाला आणि जोथी मनी यांचा या समितीत समावेश आहे. पाच राज्यांना भेट देऊन तिथल्या कार्यकर्त्यांशी, उमेदवारांशी आणि राज्याच्या नेतृत्वाशी चर्चा करून ही समिती एक अहवाल तयार करेल आणि तो काँग्रेसच्या काळजीवाहू अध्यक्षा सोनिया गांधींसमोर सादर करेल.

पाच राज्यांत काय झाली काँग्रेसची अवस्था

पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) काँग्रेसची अवस्था दयनीय झाली आहे. पहिल्यांदाच काँग्रेसला एकही सीट मिळाली नाही. सीपीआयएम आणि फुरफुरा शरिफचे प्रमुख मौलवी अब्बास सिद्दिकी यांचा पक्ष भारतीय धर्मनिरपेक्ष फ्रंटसोबत आघाडी केली होती. तरीही काँग्रेसला राज्यात एकही जागा जिंकता आली नाही. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यांतही त्यांचा पराभव झाला.

केरळमध्ये (Kerala) सत्तेत परतण्याची शक्यता काँग्रेसला वाटत होती पण ते शक्य झालं नाही. आसाममध्येही (Assam) काँग्रेसचा पराभव झाला. पुदुच्चेरी या केंद्रशासित प्रदेशात गेल्यावेळी काँग्रेसचं सरकार बनूनही यावेळी त्यांचा पराभव झाला. जमेची बाजू म्हटलं तर फक्त तमिळनाडूमध्ये  (Tamil Nadu) डीएमकेसोबत काँग्रेस पक्ष 10 वर्षांनंतर सत्तेत आला आहे. त्यामुळे या समितीच्या अहवालाला महत्त्व प्राप्त झालं आहे. पराभवाची कारणं शोधून त्यावर उपाय शोधण्याची गरज काँग्रेसला आहे.

सोनिया गांधीनी व्यक्त केली चिंता

काँग्रेस कार्यसमितीच्या बैठकीत काँग्रेसच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवावर चर्चा झाली. त्यात पश्चिम बंगालचे निवडणूक प्रभारी जितीन प्रसाद यांनी आयएसएफशी केलेल्या आघाडीला पराभवासाठी जबाबदार ठरवलं. आसामध्ये एआययूडीएफशी केलेल्या आघाडीबाबतही अनेकांनी प्रश्न उपस्थित केला अशी माहिती सूत्रांनी दिली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काळजीवाहू अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) म्हणाल्या,‘आपण एक समिती तयार करू ती पराभवाच्या प्रत्येक पैलूवर विचार करेल. केरळ आणि आसाममध्ये का पराभव झाला हे आपण शोधून काढलं पाहिजे. पश्चिम बंगालमध्ये आपल्या हाताला एकही जागा लागली नाही. या गोष्टी त्रासदायक असल्या तरीही त्यांचा सामना करून त्याबाबत विचार करायला हवा. याकडे आपण दुर्लक्ष केलं तर आपल्याला यातून धडा घेता येणार नाही.’

आझाद यांच्या अध्यक्षतेखाली कोरोनासाठी टास्क फोर्स

कोरोना महामारीच्या काळात जनतेला मदत करण्यासाठी काँग्रेस पक्षाने 13 सदस्यांचा टास्क फोर्स तयार केला आहे. माजी केंद्रीय आरोग्यमंत्री गुलाम नबी आझाद या फोर्सचे अध्यक्ष असून, प्रियांका गांधी, अंबिका सोनी, जयराम रमेश, रणदीप सुरजेवाला, पवन खेडा आणि श्रीनिवास या नेत्यांचा या फोर्समध्ये समावेश आहे.

source:news18

0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: