मुंबई 17 मे: कोरोनामुळं संपूर्ण देश सध्या त्रस्त आहे. गेल्या वर्षभरात देशभरातील हजारो लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. लॉकडाउनमुळं लोक बेरोजगार झाले आहेत. सर्वत्र निराशेचं वातावरण निर्माण झालं आहे. अशीच अवस्था आपल्या आधी इटली या देशात निर्माण झाली होती. भारतानं त्यांच्या परिस्थितीचं निरिक्षण करुन लवकरात लवकर उपाययोजना कराव्यात अन्यथा आपलीही अशीच परिस्थिती होईल अशी भविष्यवाणी मराठी अभिनेत्री मुक्ता बर्वेनं केली होती. दुदैवाची बाब म्हणजे तिची ही भविष्यवाणी खरी ठरली आहे.
गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात प्रख्यात इटालियन लेखिका फ्रान्सेसका मेलँड्री यांनी एक पत्र लिहिलं होतं. या पत्राद्वारे त्यांनी जगभरातील देशांना कोरोनापासून सावध केलं होतं. या पत्राचा मराठी अनुवाद मुक्ता बर्वे हिनं केला होता. आज तिचा वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त पाहूया या पत्रामध्ये तिनं काय म्हटलं होतं? अन् तिची कुठली भविष्यवाणी खरी ठरली.
मुक्तानं काय म्हटलं होतं या पत्रात?
“मी हे पत्र तुम्हाला इटलीतून म्हणजेच तुमच्या भविष्यकाळातून लिहिते आहे. करोनाची साथ ही अगदी आमच्या देशाप्रमाणेच तुमच्या देशातही एका विशिष्ट पद्धतीने पसरते आहे. त्यामुळे तुमचा प्रवासही आमच्यासारखाच असणार आहे. करोनाच्या बाबतीत वेळेचा विचार केला तर आम्ही तुमच्या पुढे आहोत. जसं वुहान होतं आमच्या काही आठवडे पुढे.. आम्ही तसंच वागलो जसं आत्ता तुम्ही वागता आहात. आमच्याकडेही परिस्थितीचं गांभीर्य कळलेले आणि न कळलेल्या लोकांमध्ये वाद आहेत जसे आमच्याकडे होते. एकीकडे सरकारने दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन करणारे लोक.. आणि दुसरीकडे साधा फ्लू तर आहे त्यात एवढी काय काळजी करण्याचं कारण असा प्रश्न विचारणारेही आहेत. पण लवकरच हे ही वाद मागे पडतील. तुम्ही रोज घरी छान जेवाल, कारण तुम्हाला करण्यासारखं फारसं काहीच नसेल. तुमच्या मोकळ्या वेळेचा सदुपयोग तुम्ही कसा करावा? यासाठी तुम्ही इंटरनेटवरुन मार्गदर्शन घ्याल. वेगवेगळे छंद असलेल्या आणि आवडीनिवडी असलेल्या अनेक ऑनलाईन ग्रुप्सचा तुम्ही भाग व्हाल. सुरुवातीला कुतूहल वाटणाऱ्या गोष्टींकडे नंतर तुम्ही ढुंकूनही पाहणार नाही..अनेक वर्षे तुमच्या कपाटात धूळ खात पडलेली पुस्तकं तुम्ही वाचायला घ्याल. पण त्यातही तुमचं मन फार काळ रमणार नाही. तुम्ही पुन्हा जेवाल पण यावेळेस तुम्हाला झोप लागणार नाही. आपल्या देशाचं त्यातल्या लोकांचं काय होणार? हा प्रश्न तुम्हाला पडेल”
source:news18