सिडनी, 17 मे: ऑस्ट्रेलियाची क्रिकेट टीम गेल्या तीन वर्षांपासून त्यांच्यावर लागला बॉल टॅम्परिंग प्रकरणाचा (Ball Tampering Scandal) डाग धुण्याचा प्रयत्न करत आहे. या प्रकरणात मुख्य सहभाग असलेल्या कॅमेरुन बॅनक्रॉफ्ट (Cameron Bancroft) याच्या गौप्यस्फोटानं त्यांची चिंता वाढली आहे. बॅनक्रॉफ्ट पाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन मायकल क्लार्कनं (Michael Clarke) केलेल्या वक्तव्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळण्याची शक्यता आहे.
काय म्हणाला होता बॅनक्रॉफ्ट?
बेनक्रॉफ्टनं ‘गार्डियन’ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये या प्रकरणात आजवर कधीही समोर न आलेली माहिती सांगितली आहे. ‘बॉल टेम्परिंग प्रकरणाची माहिती बॉलर्सना होती. मात्र तरीही मला, वॉर्नरला आणि स्मिथला या प्रकरणात शिक्षा झाली. मी या प्रकरणात केलेल्या कृतीला जबाबदार आहे. पण याची माहिती टीमला होती. माझ्या कृतीचा (Ball tampering) फायदा बॉलर्सनाच होणार होता. ही एकच गोष्ट हे पटवून देण्यासाठी पुरेशी आहे.’ असा दावा बॅनक्रॉफ्टनं केला होता.
क्लार्कनं केला दावा
ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन मायकल क्लार्कनं देखील या प्रकरणात उडी केली आहे. बॉल टेम्पिररिंग प्रकरणात शिक्षा झालेल्या तीन खेळाडूंपेक्षा जास्त जणांना या प्रकरणाची माहिती होती. मैदानात सँडपेपरचा वापर होणार आहे, हे टीममधील सदस्यांना माहिती होती, असा दावा क्लार्कनं ‘बिग स्पोर्ट्स ब्रेकफास्ट’ या कार्यक्रमात बोलताना केला आहे
‘या स्तरावर खेळणाऱ्या खेळाडूंना मैदानात वापरल्या जाणाऱ्या साहित्याबद्दल सविस्तर माहिती असते. त्यांना बॉल टेम्परिंग झाल्याचं समजलं नाही यावर विश्वास ठेवणे अवघड आहे. मॅच खेळताना माझ्या बॅटमध्ये काही बदल झाला तर मला लक्षात येतं. तसंच बॉलर्सना देखील त्यांनी बॉल पाहिल्यावर त्यामध्ये काय बदल होतो हे लगेच समजतं,’ असं क्लार्कनं स्पष्ट केलं आहे.
source:news18