कोरोना संपावा याकरता भाजप आमदारानं केलं होमहवन, शहरात फिरवला होमयज्ञ! पाहा VIDEO

बेळगाव, 25 मे: देश आज कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी (Second Wave of Coronavirus) लढत आहे. गेल्या दोन-तीन आठवड्यांपासून या दुसऱ्या लाटेची तीव्रता जरी कमी झाली असली तरीही अद्याप कोव्हिड-19 चा धोका टळलेला नाही. सर्वच राज्य आपापल्या क्षमतेनुसार कोरोनाविरोधात लढा देत आहेत. फ्रंटलाइन वर्कर्स जसं की डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय, लॅबमध्ये काम करणारे कर्मचारी, रुग्णवाहिका चालक, पोलीस कर्मचारी इ. अनेकजणं आपल्या वैयक्तिक आयुष्यातील सुखांना तिलांजली देत देशसेवेसाठी झटत आहेत. अशावेळी सामान्य नागरिकही त्यांच्या क्षमतेनुसार आर्थिक आणि मानसिक साहाय्य करत आहे. सेलिब्रिटी, कलाकार, खेळाडू, नेतेमंडळी देखील कोरोनाच्या (India Fights Corona) या लढाईत पुढे सरसावली आहेत.

दरम्यान कोरोनाविरोधात सुरू असणाऱ्या लढ्यामध्ये भाजप आमदाराने होमहवन केल्याची बातमी समोर येते आहे. बेळगावमधील भाजप आमदाराने अशाप्रकारे कोरोना जाईल या विश्वासाने होमहवन केल्याची घटना घडली आहे. अशाप्रकारे होम-हवन केल्याने कोरोना जाणार आहे का? असा टीकात्मक सवाल त्यानंतर विचारण्यात येत आहे.

भाजप आमदार अभय पाटील यांनी हे होमहवन केलं आहे. कोरोनाचे संकट दूर व्हावे याकरता त्यांनी हा यज्ञ केला. दरम्यान एवढेच नव्हे तर त्यांनी बेळगाव शहरातील गल्ल्यांमध्ये हा होम पेटलेला गाडा देखील फिरवला आहे. अभय पाटील बेळगाव दक्षिणचे भाजपा आमदार असून या घटनेनंतर त्यांच्यावर टीका केली जात आहे.

पाहा व्हिडीओ-

पहिल्यांदा 2004 साली अभय पाटील (Abhay Patil) यांनी विधानसभा निवडणूक जिंकली होती. त्यावेळच्या बागेवाडी विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आले होते.  2008 साली विधानसभा मतदारसंघ पुनर्रचना झाल्यानंतर बागेवाडी मतदारसंघ रद्द होऊन बेळगाव दक्षिण मतदारसंघ उदयास आला. यानंतर पाटील 2008 ची विधानसभा निवडणूक जिंकले. 2013 मध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीच्या संभाजी पाटील यांनी त्यांचा पराभव केला. त्यानंतर पुन्हा 2018 साली ते याच मतदारसंघातून निवडून आले. एकूण तीन वेळा ते या मतदारसंघात आमदार म्हणून कार्यरत आहेत.

बेळगावातून काही दिवसांपूर्वी अशीच एक घटना घडली होती. कोरोनाच्या संकटकाळामध्ये कोणत्याही धार्मिक कार्यक्रमांनाही परवानगी मिळालेली नाही. एवढंच काय पण अंत्यसंस्काराच्या विधीलाही मोजक्या लोकांच्या उपस्थितीलाच परवानही दिली जात आहे. मात्र बेळगावमध्ये घोड्याच्या अंत्यसंस्कारासाठी तोबा गर्दी जमा झाली होती. अंत्यसंस्कारासाठी हजारोंची गर्दी झालेला हा घोडा एका आश्रमाशी संबंधित होता. कोन्नूरच्या जवळ असलेल्या कदासिद्धेश्वर आश्रमातील हा घोडा होता. जगातील कोरोना नष्ट व्हावा म्हणून या घोड्याला सोडून देण्यात आलं. त्यानंतर हा घोडा दोन दिवस गावामध्ये चरत होता. पण अचानक त्याचा मृत्यू झाला आणि त्यानंतर त्याची अंत्ययात्रा पाहण्यासाठी ही हजारोंची गर्दी जमा झाली.

source:news18

0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: