Steve Smith कधीच बनू शकणार नाही ऑस्ट्रेलिया टीमचा कॅप्टन? बॉलशी छेडछाड प्रकरण भोवणार

नवी दिल्ली, 25 मे: ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा माजी कॅप्टन मार्क टेलर (Mark Taylor) याच्या म्हणण्यानुसार, 2018मध्ये बॉलची छेडछाड करण्याचं प्रकरण (Ball Tampering) कधीही पूर्णतः शमणार नाही. या प्रकरणाची माध्यमांमध्ये पुन्हा चर्चा सुरू झाल्यामुळे स्टीव्ह स्मिथच्या (Steve Smith) पुन्हा कॅप्टन होण्याच्या (Captaincy) शक्यतेवर पाणी पडू शकतं, असं टेलर म्हणतो.

बॉलची छेडछाड करण्याच्या प्रकरणातल्या सहभागाबद्दल स्मिथ याला कॅप्टनपदावरून काढण्यात आलं होतं. तसंच, त्याच्यावर एका वर्षासाठी निर्बंध घालण्यात आले होते. स्मिथने अलीकडेच (Team Australia) ऑस्ट्रेलियाच्या टीमचं कॅप्टनपद पुन्हा स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली होती. तसंच टेस्ट क्रिकेट टीमचा विद्यमान कॅप्टन टीम पेन (Tim Penn) यानेही त्याच्या म्हणण्याला पाठिंबा दिला होता.

हे प्रकरण अलीकडे दोन वेळा चर्चेत आलं. या प्रकरणातल्या सहभागासाठी नऊ महिन्यांची बंदी घालण्यात आलेल्या कॅमरन बेनक्रॉफ्टने (Cameron Bencraft) अलीकडेच सांगितलं होतं, की दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) विरुद्ध केपटाउनमध्ये झालेल्या कसोटी मॅचदरम्यान बॉलवर सँडपेपर (Sandpaper) वापरण्यात आल्याची माहिती बॉलर्सना (Bowlers) होती की नव्हती, याबद्दल कोणीही स्वतःहून समजू शकतो.

मार्क टेलरने ‘स्पोर्ट्स संडे’ या माध्यमाशी बोलताना सांगितलं, ‘यात काही शंका नाही, की या प्रकरणामुळे त्याच्या कॅप्टन्सीच्या शक्यतेवर पाणी पडू शकेल. कारण खेळाशी संबंधित अधिकाधिक व्यक्तींची अशीच इच्छा असेल, की हे प्रकरण संपावं; पण हे प्रकरण असं संपणार नाही.’

‘स्टीव्ह स्मिथकडे पुन्हा कॅप्टन्सी येण्यासंदर्भातला माहौल तयार होत आहे, यात काही शंका नाही,’ असंही टेलरने स्पष्ट केलं. बॉलची छेडछाड झाल्याच्या प्रकरणावेळी ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये सहभागी असलेल्या पॅट कमिन्स, जोस हॅझलवूड, मिचेल स्टार्क आणि ऑफस्पिनर नाथन लियान या खेळाडूंनी अलीकडेच संयुक्त निवेदन जाहीर केलं होतं. त्या प्रकरणासंदर्भात वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत, अटकळी बांधल्या जात आहेत, त्यावर पूर्णविराम लावला जावा, अशी मागणी त्यांनी या निवेदनातून केली होती. टेलर यानेही या चार खेळाडूंच्या मागणीचा पाठिंबा दिला.

ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन मायकल क्लार्क (Micheal Clark) याने या प्रकरणाचा तपास न केल्याबद्दल आणि हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केल्याबद्दल ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’वर (Cricket Australia) टीका केली होती.

source:news18

0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: