प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या अभिनेता भूषण कडूवर नियतीचा घाला; कोरोनामुळं पत्नीचं निधन

मुंबई : कोरोना विषाणूच्या संसर्गामुळं साऱ्या देशात हाहाकार माजला आहे. अनेकांनीच आपल्या जवळच्या व्यक्तीला या संसर्गामुळं कायमचं गमावलं आहे. अनेक बालकं अनाथही झाली आहेत. या विषाणूनं गरीब, श्रीमंत, लहान मोठा असा कोणताही भेट केलेला नाही. अशा या घातक विषाणूमुळं प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हसू आणणाऱ्या अभिनेता भूषण कडू याच्या जीवनात मात्र नियतीनं दु:ख लोटलं आहे.

‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेता आणि विनोदवीर भूषण कडू याच्या पत्नीचं म्हणजेच कादंबरी कडू यांचं वयाच्या अवघ्या 39 व्या वर्षी कोरोनामुळं निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. कादंबरी कडू यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती, त्यांच्यावर उपचारही सुरु होते. पण, अखेर त्यांची ही झुंज अपयशी ठरली. शनिवारी सकाळी कादंबरी यांनी अखेरचा श्वास घेतला.

भूषण कडूच्या काही मित्र आणि निकटवर्तीयांनी त्यांच्या पत्नीच्या निधनाच्या वृत्ताला दुजोरा दिला. सुरुवातीला त्यांना ठाण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ज्यानंतर त्यांना मुंबईतील केईएम रुग्णालयातही आणण्यात आलं. पण, नियतीच्या मनात मात्र काही वेगळंच होतं. सध्या भूषण कडूच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 7-8 वर्षांच्या मुलाला मागं ठेवून आणि सहजीवनाचा हा प्रवास अर्ध्यावरच सोडून कादंबरी यांनी जगाचा निरोप घेतला आहे. नियतीनं या कलाकाराच्या कुटुंबासोबत केलेला खेळ पाहून अनेकांचं मन हेलावत आहे.

‘बिग बॉस’च्या घरात असतेवेळी भूषणची पत्नी सर्वांसमोर आली होती. आपल्या विनोदी शैलीच्या अभिनयासोबतच मनमिळाऊ स्वभावासाठी हा अभिनेता कायमच सर्वांची मनं जिंकत असतो. पण, इतरांच्या आनंदासाठी कला सादर करणाऱ्या या कलाकावर आता मात्र ही काय वेळ आली, असंच म्हणत अनेकांनीच त्याच्या दु:खात सहभागी होण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यानच्या कोरोना काळात अनेक कुटुंबांचं होत्याचं नव्हतं झालं. कालपरवा आपल्या सोबत असणाऱ्या व्यक्ती या विषाणूच्या संसर्गामुळं हिरावल्या गेल्या. त्यामुळं तसुभर दुर्लक्षही तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकतो. म्हणून नियम पाळा, घरी राहा सुरक्षित राहा!

source:news18

0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: