मुंबई, 09 जून: आज मान्सूननं मुंबई (Mumbai) मध्ये एन्ट्री केली आहे. हवामान विभागानं ही माहिती दिली आहे. मुंबईला रात्रभर पावसानं चांगलंच झोडपलं आहे. अजूनही हा पाऊस मुंबईच्या (Mumbai Rain) अनेक ठिकाणी सुरु आहे. मुंबईतल्या पश्चिम उपनगर अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव दमदार पाऊस सुरू आहे. तर पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरु आहे. पावसामुळे रेल्वेची वाहतुक विस्कळीत झाली आहे. मध्य रेल्वेची मुंबईच्या दिशेनं जाणारी वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत बंद करण्यात आली आहे.
या मुसळधार पावसाचा लोकल वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सायन रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे. पहिल्याच पावसात मुंबतील सखल भागासह अनेक रेल्वे स्थानकांमध्येही पाणी भरलं आहे. मुंबईत मुसळधार पावसामुळ ट्रॅक पाण्याखाली गेल्याचं चित्र आहे.
जोरदार झालेल्या पावसामुळे काही तासातच सायनच्या गांधी मार्केटमध्ये पाणी साचलं आहे. सायन, किंग्ज सर्कल, हिंदमाता याठिकाणी मोठ्याप्रमाणावर पाणी साचले आहे. सायनमध्ये अनेक घरे आणि दुकानांमध्ये पाणी शिरले आहे.
नवी मुंबई, उरण आणि पनवेलमध्ये मुसळधार पाऊस
आज पहाटे पासून नवी मुंबई, उरण आणि पनवेल मध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. नवी मुंबईतील ऐरोली, कोपरखैरणे, वाशी, नेरुळ, बेलापूर तर पनवेल मधील खारघर, कामोठे, पनवेल मधील विभागांना झोडपून काढलं आहे. उरण मधील ग्रामीण आणि समुद्रकिनारपट्टी वरील गावांना ही या पावसाने झोडपून काढलं. ढगाळ वातावरणात पावसाची संततधार सुरूच आहे. यामुळे चाकरमान्यांचे हाल झालेत.
source:news18