सांगली, 7 सप्टेंबर : श्री गजानन (Shree Gajanan) हें सांगलीचे आराध्य दैवत असून सर्व धर्मियांचे ते श्रद्धास्थान आहे. चोर गणपती (Chor Ganpati) बसवण्याची येथे शेकडो वर्षाची परंपरा आहे. गणेश चतुर्थीच्या चार दिवस आगोदर या गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. चोर गणपती बसवण्याची येथे शेकडो वर्षाची परंपरा सांगलीत आहे. त्यानुसार सांगलीच्या गणपती मंदिरात (Sangli Ganpati Mandir) चोर गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आली.
श्री गणपती पंचायतन संस्थानच्या सांगलीतील प्रसिध्द गणपती मंदिरात हा चोर गणपती बसवला जातो. मात्र कोरोनाच्या या महामारीत मंदिर बंद असल्याने भक्तांनी बाप्पाचे बाहेरूनच दर्शन घेतले. गणेश चतुर्थीला सर्वत्र थाटामाटात गणेशाचे आगमन होते. सांगलीत मात्र चार दिवस अगोदर गणेशाचे आगमन होते. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी या काळात हा गणपती बसवला जातो.

कोणालाही माहिती न पडता गणेशाची स्थापना होते, म्हणून या प्रथेला चोर गणपती म्हणतात. सांगलीमध्ये ही गेल्या दोनशे वर्षापासून परंपरा सुरु आहे. चोर गणपतीची मूर्ती कागदी लगदयापासून बनवली गेली आहेत. या मूर्तीचे विसर्जन केले जात नाही त्यांचे जतन केले जाते. हया मूर्तीला सुखरूप ठिकाणी ठेवले जाते.

या गणपती बरोबरच गणेश चतुर्थीला नियमित गणेशाची स्थापना होते. या ठिकाणी पाच दिवस आराधनेचा सोहळा असतो. राजे विजयसिंह पटवर्धन यांच्या श्री गणपती पंचायतन संस्थानच्या हया सोहळ्यासाठी अनेक राज्यातील शेकडो भाविक येतात. या ठिकाणचे गणपती मंदिर प्रसिध्द असून हा नवसाला पावणारा गणपती आहे. या परिसरातील एकात्मता मंदिर असून येथे सर्व धर्मियांचे पवित्र धर्म ग्रंथ ठेवण्यात आले आहेत. पाचव्या दिवशी मिरवणुकीने येथील गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. मात्र कोरोनाच्या काळात गेले दोन वर्षे झाले कोणतेही धार्मिक कार्यक्रम झाले नाहीत. यंदा ही भक्तांना लांबूनच दर्शन घ्यावे लागत आहे.