मुंबई : Shiv Sena-BJP alliance News : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपल्या मनातली भावना बोलून दाखवली आहे, असे मला वाटते. राजकारणात काहीही होऊ शकत. राज्यात सक्षम विरोधी पक्ष आहे. सत्तेतील सहकाऱ्यांमुळेच मुख्यमंत्र्यांनी मनातली इच्छा बोलून दाखवली असेल अशी पहिली प्रतिक्रीया भाजपचे नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केली आहे.
मुख्यमंत्र्यांनी केले मोठे विधान, नव्या राजकीय चर्चांना उधाण
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद जिल्हा परिषद इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी केलेल्या विधानावरून वेगळी राजकीय चर्चा सुरु झाली आहे. पुन्हा शिवसेना – भाजप यांच्यात युती होणार का, याची चर्चा जोर धरु लागली आहे. औरंगाबादच्या कार्यक्रमात रावसाहेब दानवे यांनी तुफान बॅटिंग केली. त्यावेळी दानवे यांनी मराठवाड्याच्या विकासासाठी रेल्वेच्या माध्यमातून काही काम करायचे असेल तर चौकटीबाहेरही जाऊन काम करू शकतो. त्यासाठी मुख्यमंत्रीसाहेब तुमचीही मदत लागेल, असे दानवे म्हणाले. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनीही आमचं सरकार तुमच्या पाठिशी असल्याचं सांगत दानवेंना शब्द दिला.
केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आपली प्रतिक्रिया दिल्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे की, राजकारणात काहीही होऊ शकते. आमचे लक्ष सत्तेकडे नाही. अनैसर्गिक गटबंधन सरकार फार काळ चालत नाही हे कदाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आता कळले असेल. राजकारणात कधीही काहीही घडू शकते पण आताच ते शक्य नाही. आम्ही सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करु, असे फडणवीस म्हणाले.
काँग्रेस राष्ट्रवादीसोबत चांगला अनुभव येत नसेल त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं असेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीची भूमिका दुटप्पी आहे. आज यांचा खरा चेहरा पुढे आला आहे. मुख्यमंत्री यांना कदाचित लक्षात येत असेल की ते कशा भ्रष्टाचारी सरकारमध्ये ते आहेत. कदाचित त्यामुळे तसे विधान असावे, असे फडवणीस म्हणाले.