मुसळधार पावसात ST बस पुलावरुन थेट पाण्यात कोसळली, घटनेचा LIVE VIDEO

यवतमाळ, 28 सप्टेंबर : मुसळधार पावसात एसटी बस (ST Bus) थेट पाण्यात कोसळल्याची घटना समोर आली आहे. नागपूरहून नांदेडकडे जाणाऱ्या एसटीच्या हिरकणी बसला अपघात झाला आहे. बस थेट पाण्यात कोसळली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील (Yavatmal district) उमरखेड (Umerkhed) शहरापासून काही अंतरावर ही दुर्घटना घडली असल्याची माहिती समोर येत आहे. ही संपूर्ण घटना मोबाइल कॅमेऱ्यात कैद झाली आहे. (Live Video of ST bus fall into river in Yavatmal)

नदीवरुन पाणी वाहत असताना एसटी बस चालकाने नको ते धाडस करत प्रवाशांचा जीव धोक्यात घातला. या पुलावरुन पाणी वाहून जात असतानाही चालकाने त्या पाण्यातून गाडी नेली आणि पाण्याच्या प्रवाहात ही बस वाहून गेली. या अपघाताचे दोन व्हिडीओ समोर आले आहेत. एका व्हिडीओत एसटी बस थेट पाण्यात वाहून जात असताना दिसत आहे. तर दुसऱ्या व्हिडीओत बसमधील प्रवासी आपले प्राण वाचवण्यासाठी धडपड करत असताना दिसत आहेत. बसच्या टपावर अडकलेले प्रवासी मदतीसाठी हाक देत आहेत.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड येथून 2 किमी अंतरावर असलेल्या दाहगाव येथे आलेल्या पुरात बस वाहून गेली. या बसमध्ये 4 ते 6 प्रवासी प्रवास करत होते. त्या पैकी एका प्रवाशाचा मृतदेह सापडला आहे. तर दोघांना वाचविण्यात यश आले आहे. ही घटना सकाळी 8 वाजताच्या दरम्यान घडली. घटनास्थळी मोठ्या वेगाने बचाव आणि मदतकार्य सुरू आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने मदत आणि बचावकार्य सुरू आहे. तीन प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. मात्र, अद्याप एसटी चालक आणि एसटी वाहक यांची माहिती मिळू शकलेली नाहीये.

गेल्या दोन दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या मुसळधार पावसामुळे नद्या-नाल्यांना पूर आला आहे. नद्या ओसंडून वाहत असल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाहनांच्या रांगा लागल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांनाही घटनास्थळी पोहोचण्यात अडचणी येत आहेत.

बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळाची (Cyclone Gulab) तीव्रता आता कमी दाबाच्या तीव्र क्षेत्रात झाली आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवला आहे. राज्यातील 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट (Red Alert for 7 districts of Maharashtra) तर 10 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

या 7 जिल्ह्यांना रेड अलर्ट (Red Alert for 7 districts)

पालघर

ठाणे

रायगड

रत्नागिरी

नाशिक

धुळे

जळगाव

या 10 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट

मुंबई

सिंधुदुर्ग

नंदुरबार

पुणे

अहमदनगर

औरंगाबाद

जालना

बीड

परभणी

हिंगोली

गुलाब चक्रीवादळामुळे 28 सप्टेंबर 2021 ते 1 ऑक्टोबर 2021 या कालावधीत कोकण किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामुळे नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये तसेच या कालावधीत योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

या कालावधीत कोकण किनारपट्टीच्या भागात 40-45 ते 60 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. या कालावधीत समुद्र खवळलेला राहणार आहे. त्यामुळे मच्छिमारांनी समुद्रात मासेमारीसाठी जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. यासोबतच समुद्र किनारपट्टीच्या भागातील गावांनाही सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

source:news18
0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: