Nashik| खाणीत बुडून 8 वर्षांच्या मुलाचा मृत्यू; आपली मुले खेळायला कुठे जातायत यावर लक्ष ठेवा…!

Nashik| खाणीत बुडून 8 वर्षांच्या मुलाचा मृत्यू; आपली मुले खेळायला कुठे जातायत यावर लक्ष ठेवा…!

नाशिकः मित्रांसोबत खेळायला बाहेर पडलेल्या 8 वर्षांच्या मुलाचा खाणीत बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आयान रफिक शेख असे मृत मुलाचे नाव आहे. विल्होळी शिवारातील चुंचाळे परिसरातील घरकुल योजनेजवळच्या खाणीत हा मुलगा बुडाला. परिसरातील नागरिकांनी या मुलाला वाचवण्याचे प्रयत्न केले. मात्र, त्याला यश आले नाही. याप्रकरणी पोलिसांत तक्रार नोंदवण्यात आली आहे.

अशी घडली घटना

अंबड औद्योगिक वसाहतीजवळ चुंचाळे परिसरातील घरकुल योजनेजवळ अनेक खाणी आहेत. यंदा पावसाने चक्क डिसेंबर महिन्यातही हजेरी लावली. त्यामुळे या खाणीमध्ये पाणी साचले आहे. अनेक मुले या परिसरात दररोज खेळायला येतात. चुंचाळे, घरकुल येथे राहणारा आयान रफिक शेख (वय 8) हा तिघा भावंडासोबत या दगडी खाणीजवळच्या पाण्यात खेळायला गेला होता. मात्र, खेळताना त्याचा पाय घसरला. तो खाणीच्या पाण्यात पडून बुडाला. यावेळी त्याच्या भावडांनी आरडाओरडा केला. त्यांनी रडून आकांत माजवला. त्यावेळी आयानच्या घरातल्यांनी खाणीकडे धाव घेतली.

खड्ड्यांत साचले पाणी

खाणीत मुलगा बुडाल्याची माहिती समजताच लोकप्रतिनिधी आणि परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथकही या ठिकाणी पोहचले. साऱ्यांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले. मात्र, आयानला वाचवण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. नाशिकमध्ये अनेक भागात बांधकामे सुरू आहेत. त्यासाठीही ठिकठिकाणी मोठ-मोठे खड्डे खणण्यात आले आहेत. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी आपली मुले खेळायला कुठे जातात, काय खेळ खेळतात याकडे लक्ष ठेवण्याची गरज आहेत. अन्यथा आणखी एखादी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पालकांनी हे करावे

पालकांनी आपले मूल खेळायला कुठे जात आहे, यावर जरूर लक्ष ठेवावे. शक्यतो मुलांना घराबाहेर खेळायला पाठवताना एकट्याला पाठवू नये. त्याच्यासोबत कोणीतरी ज्येष्ठ व्यक्ती असावीच. पाणी साचलेले मोठे खड्डे, खाण, विहीर, तलाव इत्यादी ठिकाणी मुलांना खेळायला एक तरी पाठवू नये. पाठवले तर त्यांच्यासोबत घरातीलच कोणीतरी व्यक्ती असावी. अन्यथा मुले पाणी कमी आहे म्हणून पाण्यात उतरतात. अनेकदा मुलांचा पाय घसरतो. असे काहीही होऊ शकते. त्यामुळे पुढची दुर्घटना टाळण्यासाठी पालकांनी दक्ष राहण्याची गरज आहे.

source:tv9news

0Shares
Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: